Mani Hasabnis

Blog Post

Thursday, February 23, 2017

स्टिल लाईफ

समुद्राच्या लाटा पायांना स्पर्श करून माघारी फिरत होत्या. अथांग पसरलेल्या समुद्राकडे मी पहात उभा होतो. दूर समुद्रात बुडणारा सूर्य मला मात्र स्टिल लाईफ मधल्या करड्या कापडापुढे ठेवलेल्या संत्र्यासारखा दिसत होता. “स्टिल लाईफ करताना कंपोझ महत्वाचा असतो, हसबनीस. नुसत्या वस्तू नाही काढायच्या, फडताळात मांडून ठेवल्यासारख्या!" इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेच्या वेळेचं केसकर सरांचं वाक्य आठवलं.

मनातल्या मनात माझं कंपोझिशन सुरु झालं. दोन्ही हातांचे अंगठे आणि तर्जनींची चौकट करून मी डोळ्यासमोर धरली. चौकटीतून समोर पाहू लागलो. हे संत्र कॅनव्हासवर नक्की ठेवायचं कुठे ? होरायझनवर. पण मग माझ्या पेंटिंगचं होरायझन नक्की आहे कुठे ? तांबड्या काळ्या भरजरी चंदेरी काठाच्या पैठणीवर हे संत्र ठेऊ ? की काळपट करड्या कापडावर अधांतरी तरंगणारं संत्रं ? पैठणीवर ठेवायचं तर संत्र्याची कास्ट शॅडो कशी काढणार ? कारण ती तर पडलीच नव्हती. मी नेचर करतोय की मॅनमेड ? लँडस्केप करतोय की स्टिल लाईफ ? प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना शिक्षकांनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांमुळे मी पुरता भांबावून गेलो होतो.

माझ्या मेंदूमध्ये थोडा केमिकल लोचा आधीपासूनच असावा. नाहीतर समुद्रकाठी उभा राहून दूरवर मावळत असणारा सूर्य मला स्टिल लाईफमधल्या संत्र्यासारखा का दिसावा ? अंधमित्रांना आपल्या बरोबरीने पेंटिंग्स पाहता यायला हवीत असा हट्ट मी का धरावा ? नुसता हट्टच नाहीतर त्यासाठी चार वर्षांहून अधिक काळ त्या वेडासाठीच का वेचावा ?

कुणाची चाहूल लागली म्हणून मी वळून पाहिलं तर उत्तम येत असलेला दिसला. तो आत्ता अचानक इथे कसा काय ? आश्चर्य वाटलं. किनाऱ्यावरील वाळूत त्याचे पाय रुतत होते. हातातील व्हाईट केनने तोल सांभाळत तो हळूहळू पुढे येत होता. हाक मारून त्याला मी कुठे उभा आहे ते सांगितलं. तो माझ्यापाशी आला. आम्ही तामसतीर्थच्या दिशेने चालू लागलो.

उत्तम म्हणाला, मी तुमच्या उजव्या बाजूने चालतो. म्हणजे समुद्राची येणारी प्रत्येक लाट आपल्याला दिशाभान सांभाळण्याची सूचना देत राहील. मी चमकून उत्तमकडे पाहिलं. स्टिल लाईफ करताना पट्टी वापरायची नसते. चित्राला बॉर्डर करताना सुद्धा. हातात पेन्सिल धरून ड्रॉईंग बोर्डच्या कडेवर करंगळी टेकवायची आणि कागदाच्या एका कडेपाशी पेन्सिल टेकवून हात दुसऱ्या कडेपर्यंत न्यायचा. अगदी डोळे मिटून. नववीत असताना शाळेतल्या राजे सरांनी पट्टी न वापरता बॉर्डर कशी काढायची ते शिकवलं होत. आणि आज इथे उत्तम मला स्टिल लाईफ ला बॉर्डर कशी काढायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवत होता.

उत्तम मला विचारत होता, "आता भरती आहे की ओहोटी ?" मी म्हणालो "ओहोटी." उत्तम म्हणू लागला, “ओहोटी आहे म्हणजे समुद्राचं पाणी मागे हटणार ना ? मग तरीसुद्धा ह्या लाटा किनाऱ्याकडे का येत आहेत?” 
मी स्वतःशीच म्हणालो... भरती असो की ओहोटी, समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरच येऊन धडकतात. उत्तम थबकला. त्याने खिशातून मोबाईल काढला. नेमकं उत्तर नं मिळाल्यामुळे त्याला बहुतेक गुगल करायचं असणार. पण तिथे रेंज नव्हती.

मी उत्तमला विचारलं, काय पाहतोयस ? मोबाईल खिशात ठेवत उत्तम म्हणाला, "काही नाही. आता सूर्य मावळला असेल. पण लाटा यायच्या थांबणार नाहीत. पायाखालून वाळू सरकताना गुद्गुल्याही होत राहतील. आणि आता तुम्ही म्हणाल, आता अंधार पडू लागलाय, हॉटेलवर लवकर परतायला हवं." वाक्याच्या सुरुवातीला 'अंधार कसा पडतो हे मला माहित नसलं तरी' असं तो हळूच पुटपुटल्याचा मला भास झाला. पुढे म्हणाला... "मी काय म्हणतो, ऐका ना, आत्ता आपल्याबरोबर हेलन असती तर ? हेलनला तुमच्यासारखं दिसलंही नसतं, माझ्यासारखं ऐकूही आलं नसतं आणि आपण जसं एकमेकांशी बोलतोय तसं तिला बोलताही आलं नसतं.

आता हेलनही आम्हाला जाँईन झाली. माझ्या डाव्या बाजूने माझा हात धरून चालायला लागली.

पराकोटीच्या सामर्थ्याने निर्माण झालेली कलाकृती व्यक्त होणाऱ्या माध्यमांच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेलेली असते. पण मग हेलनच्या बाबतीत अशा एखाद्या कलाकृतीचं स्थान काय असेल ? उत्तमला ड्रॉईंग करताना मी पाहिलंय. जाड कार्डशीटवर ‘टूबी’ पेन्सिलने थोडा ज्यास्त दाब देऊन तो ड्रॉईंग काढतो. उजव्या हाताने काढलेली रेषा तो डाव्या हाताच्या बोटांनी फॉलो करतो. विचार करा, पेन्सिलीने दाब दिल्यामुळे जो खड्डा पडतो (?) तो खड्डा डाव्या हाताच्या बोटांनी चाचपडत उजव्या हाताने ह्या पठ्ठ्याचं ड्रॉईंग सुरु असतं. दोन डोंगरांमध्ये उगवलेल्या सूर्याची किरणं कधी चुकूनही डोंगराच्या रेषेला स्पर्श करत नाहीत की परडीत ठेवलेल्या अननसाचे डोळे बाजूच्या लिंबावर जात नाहीत. आपण त्याचं हे थक्क करणारं व्यवधान फक्त बघत राहायचं. उत्तमचं स्टिल लाईफ बघण्यापेक्षा उत्तमचं 'स्टिल लाईफ तयार होत असताना बघणं' हा एक थरारक अनुभव असतो.

पण मग हे स्टिल लाईफ हेलन कसं अनुभवत असेल ? तिच्यासाठी नेचर काय आणि मॅनमेड काय ? लँड्सस्केप काय किंवा स्टिल लाईफ काय ? मेमरी ड्रॉईंगचा तर प्रश्नच उद्भवत नसेल ? क्षणार्धात सगळे संदर्भ बदलून गेले. उत्तम आणि हेलनने मला थेट एलिमेंटरी ग्रेड परीक्षेच्या वर्गात नेऊन बसवलं होतं.

हेलनने माझा हात सोडला आणि ती धडपडत जास्तच भरभर चालू लागली. नाराजी व्यक्त केल्यासारखी ? बापरे, माझ्या मनातल्या सगळ्या नकारात्मक शंका हेलनने ओळखल्या की काय ? मी तिला पुन्हा गाठले, तिचा हात धरला, तिने तो झिडकारला. तिच्या ह्या प्रतिक्रियेने मी आणि उत्तम, दोघेही अस्वस्थ झालो होतो. ती हातावर काहीतरी काढून दाखवत होती. तिच्या खुणांचे संदर्भ मी बारकाईने तपासून पाहू लागलो. ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती.

जे शब्द ती खुणांनी दाखवत होती ते शब्द मी मोठ्याने म्हणू लागलो. पेंटिंग... उत्तम... समुद्र... नेचर... प्रत्येक शब्दागणिक ती माझ्या तोंडावर तिचा हात ठेऊन तो शब्द समजून घेत होती. आणि मानेने नाही नाही म्हणत होती.

तिच्या खुणांतून 'स्टिल लाईफ' हा शब्द ओळखून मी उच्चारल्याबरोबर तिचा एक वेगळाच हुंकार मी ऐकला. ती एकदम टाळी वाजवून 'येस' म्हणाली बहुतेक. म्हणजे हेलनही मला स्टिल लाईफ करायला सांगत होती की काय ? नाही. ती त्यालाही नाही म्हणाली. एकदा समुद्राकडे, एकदा किनाऱ्याकडे इशारा करत राहिली.

आणि अचानक साक्षात्कार झाल्यासारखं माझ्या लक्षांत आलं. ती मला सांगत होती...
"स्टिल... देअर इज... लाईफ."

... चिन्तामणि हसबनीस 

Author: Sanjay
0 Comments
Rate this article:
No rating

Categories: BlogNumber of views: 827

Tags:

Please login or register to post comments.

123 movies