Mani Hasabnis

Blog Post

Thursday, February 23, 2017

व्हिजिटिंग कार्ड

काल बँकेतून बाहेर पडलो तेव्हा दोन तरुण एका अंधमित्राला बाजीराव रोड क्रॉस करायला मदत करत होते. दोन्ही बाजूला दोघे जण. एकाने त्यांची काठी धरलेली. दुसऱ्या तरुणाने त्यांचा हात धरला होता आणि त्यांना ढकलत ओढत ते रस्ता क्रॉस करत होते. रस्त्यावर बरेचदा दिसणारे हे दृश्य. 

मी पुढे झालो आणि विचारलं, कुठे जायचं ह्यांना? त्यांना मामलेदार कचेरीत जायचं होतं  मी त्यांना म्हणालो इथून ती जागा दोन किलोमीटर दूर आहे. मी माझ्या गाडीवरून तुम्हाला तेथे सोडू शकेन. ते हो म्हणाले. गाडीवर बसता बसता त्यांना त्यांचं नाव विचारलं. कोठून आलात विचारलं आणि म्हणालो, मामलेदार कचेरीत काय काम काढलंत ? 

त्यांचं नाव 'बाळासाहेब'.  बारावी पर्यंत शिकलेले होते. पत्ता शोधत शोधत बसने पिंपरीहून आले होते. सकाळी ९.३० वाजता घरून निघाले होते. त्यांना मामलेदार कचेरीतून जातीचा दाखला घ्यायचा होता. तो दाखला दिला की त्यांना वाय सी एच (यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल) मध्ये लिफ्ट ऑपरेटरची  नोकरी मिळणार होती. हे ऐकून बरं वाटलं. "सकाळी घरून निघताना नाष्टा करून निघालात की जेऊन?" बाळासाहेब म्हणाले, "नाही हो, आता घरी गेल्यावरच एकदम जेवणार." घड्याळात बघितलं तर १ वाजून गेला होता. घरी पोहोचायला उशीर होणार हे उघड होतं. बाळासाहेब पुढे म्हणाले आम्हाला दिसत नसल्यामुळे बाहेरचा साधा चहासुद्धा  पिता येत नाही. घरातून बाहेर पडलो की पुन्हा घरी जाईपर्यंत लघवी देखील करता येत नाही."  

बाप रे. सुन्न झालो. किती बेसिक गोष्टीसाठी झगडाव लागतं ह्यांना. हा मुद्दा कधी लक्षातच आला नव्हता. स्त्रियांची होणारी कुचंबणा देखील फार वेगळी असेल असं वाटत नाही. 

आम्ही मामलेदार कचेरी पर्यंत पोहोचलो होतो. मी त्यांना हळूच विचारलं, बाळासाहेब, पेंटिंग पाहिली आहेत का कधी ? त्यांचा चेहेरा कोरा करकरीत. काही ऐकलंच नाही असा.  मी पुन्हा विचारलं, चित्र पाहायला आवडतील का ?  “पाहिली नाहीत हो कधी. कशी पाहणार ? आम्हाला दिसत नाही ना ? पण पाहायला मिळाली तर आवडतीलच की हो.”  

मग मी त्यांना मी काढलेल्या अंधानासुद्धा  अनुभवता येतील, आनंद घेता येतील अशा चित्रांविषयी सांगितलं. बाळासाहेबांचा चेहरा पुन्हा एकदा फुलला. बाळासाहेब छान हसले. नाक-कान, भिवया पासून अगदी कपाळापर्यन्त हसले. म्हणाले,  मला आवडेल तुमची चित्र पाहायला.  मी त्यांना पुढच्या चित्र प्रदर्शनाच्या वेळेस बोलावण्याचा प्रॉमिस केलं. बाळासाहेबांनी माझा फोन नंबर मागितला. 

त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे मी त्यांना माझं कार्ड दिलं. ज्यांनी माझं कार्ड पाहिलंय त्यांच्या लक्षात येईल,  बराच वेळ ते कार्ड चाचपून पाहत राहिले आणि एकदम म्हणाले,  आमच्यासारख्या अंधानासुद्धा दिसतील अशी चित्रे काढता म्हणून तुमच्या कार्डला सुद्धा तुम्ही डोळ्यासारखं गोल भोक पाडलंय का ? 

-- चिंतामणि हसबनीस 
Author: Sanjay
0 Comments
Rate this article:
No rating

Categories: BlogNumber of views: 731

Tags:

Please login or register to post comments.

123 movies