Pages
Home
Closed Eyes & Open Minds
Drawings
Paintings
Blog
Videos
Appeal
Contact
Mani Hasabnis
Blog Post
20
Feb
2017
द मास्क
मागच्या आठवड्यात दिलीप प्रभावळकरांबद्दल एक बातमी सोशल मिडियावर फिरत होती. मलासुद्धा व्हॉट्सऍपवर ही बातमी आली होती. वाचून छातीत धस्सं झालं. ताबडतोब फोन उचलला, सर सुखरूप असल्याची खात्री केली आणि ही अफवा असल्याचं लगेच ग्रुपवर सांगून टाकलं.
मग माझी स्टुडिओत रचून ठेवलेल्या कॅनव्हास फ्रेम्सपाशी खुडबुड सुरु झाली. मध्यंतरी 'द मास्क' ह्या सिरीजवर काम करायचं ठरवून सरांची काही पेंटिंग्स करायला घेतली होती. चार - पाच ड्रॉइंग्स झाली होती, काहींची फर्स्ट फिलिंग्स करूनही झाली होती. ती सगळी पेंटिंग्स समोर मांडून ठेवली आणि एका विचित्र अस्वस्थतेत त्या पेंटिंग्सकडे बघत बसलो. पॅलेटवर रंग काढले. नकळत डोळे पाणावले. रंगच काय, काहीच दिसेना.
आनंदवनाच्या मदतीसाठी पुण्यात प्रभावळकरांनी 'चिमणराव ते गांधी' हा कार्यक्रम केला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाच्या वेळी सरांची भेट झाली. तसा मी आधीपासूनच सरांचा गरगरता पंखा होतोच.
ह्या कार्यक्रमाच्या जाहिरातीची डिझाइन्स, पोस्टर्स, नेपथ्य वगैरे गोष्टी मी करणार होतो. दिलीप प्रभावळकर त्यांच्याच सगळ्या भूमिकांच्या बाहुल्या कठपुतळीप्रमाणे खेळवत आहेत असा फोटो आम्ही पोस्टरसाठी वापरला होता. हा अप्रतिम फोटो कॅप्टन विश्वास पटवर्धनने काढला होता.
कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस कार्यक्रमाची रंगीत तालीम करणार असल्याचं सरांनी सांगितलं. स्टेजची व्यवस्था, साऊंड सिस्टीम, लाईट्स अशा सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या. काही क्लिप्स स्टेजवर दाखवायच्या होत्या, त्याचे क्लू अभय जबडे ला सांगितले. टेस्टिंग झालं. खरं तर कार्यक्रमात सर एकटेच बोलणार होते. प्रॅक्टिस न करताही अगदी सहजपणे हा कार्यक्रम त्यांना करता आला असता. पण सरांचा परफेक्शनचा आग्रह असतो आणि त्यासाठी मग सरांची कितीही मेहनत करायची तयारी असते.
कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होता. तीन वाजता सर थिएटरवर आले तेव्हा मी सेट लावत होतो. मनात धाकधूक होती.
झालं होतं असं की अगदीच ऐनवेळेला ठरल्यामुळे नेपथ्य काय करायचे वगैरे काहीच ठरलं नव्हतं. श्रुति, मंदार आणि मी; आम्हीच उत्साही वीर होतो. श्रुतीने सरांना सांगितले होते, "कार्यक्रमाचे नेपथ्य मणी करेल". श्रुति-मंदार ने माझ्यावर प्रचंड विश्वास टाकला होता. सरांनी देखील अगदी सहजपणे होकार दिला होता. आणि अवघ्या दीड दिवसात मी सेट तयार करून तो स्टेजवर लावत होतो.
सर आले. स्टेजवर सर्व कोपऱ्यातून फिरले. माझ्यापाशी आले, माझी धडधड वाढली होती. मला म्हणाले, "आता स्टेजवर मला मदतनीस म्हणून तूच थांब." मनात म्हणालो, बहुतेक आपलं काम व्यवस्थित झालेलं दिसतंय. 'चिमणराव ते गांधी' कार्यक्रम अप्रतिम झाला. अशा दोन कार्यक्रमातून आनंदवनासाठी अठरा लाख रुपये उभे राहिले. कार्यक्रमानंतर आभाने सरांना स्वाक्षरी मागितली. सरानी त्यांचे 'एका खेळियाने' हे पुस्तक स्वाक्षरी करून आभा-गार्गीला भेट दिले.
'आपलं-घर'च्या वृद्धांसाठी काही कार्यक्रम असो, 'आपलं घर' च्या लहान मुलांसाठी काही करायचं असो. प्रभावळकर जातीने हजर असतात. ‘सार्थक’ च्या अनाथ मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून माझ्या मित्राने, सन्मयने, त्यांच्यासाठी टेबल टेनिस आणि फुटबॉलचे शिबीर घेतले. तेव्हा सुध्दा हा ७२ वर्षांचा तरुण युवक, सन्मयचं आणि त्या मुलाचं कौतुक करायला सर्वात आधी हजर होता.
सरांनी दिलेले ‘एका खेळियाने’ पुस्तक वाचत असताना एक कल्पना चमकून गेली. सरांना मी फोन केला आणि मला तुमचे पोर्ट्रेट करायचे आहे. करू का ? असे विचारले. अजिबात आढेवेढे न घेता सरांनी होकार दिला. इथपर्यंत ठीक होतं. खरी अडचण पुढेच होती. मी सरांच्या घरी गेलो. त्यांना पोर्ट्रेट ची कल्पना सांगितली. मला ‘माईम शो’ मधील नटासारखा मेकअप करून पोर्ट्रेट करायचं होतं. ही विचित्र मागणी करताना छाती दडपून गेली होती. घाबरत घाबरत सरांना कल्पना सांगितली. परवानगी मिळण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. पण सर शांतपणे म्हणाले, "पुढच्या आठवड्यात फोटो काढूया का?"
अनिरुद्ध बागुल ह्या माझ्या फोटोग्राफर मित्राच्या स्टुडिओत आम्ही फोटोशूट केलं. स्पेशल मेकअप आर्टिस्ट सानिका गाडगीळने सरांचा मेकअप केला होता. मला हव्या असलेल्या पोझमध्ये फोटो काढून झाल्यावर सर म्हणाले, जरा वेगळा ट्राय करूया...
... आणि सेंच्युरी झाल्यावर बॅट्समन पुन्हा स्टान्स घेतो व इनिंग पुन्हा नव्याने सुरु करतो तसा, सरांनी पुन्हा स्टान्स घेतला. आईशपथ, पुढचा अर्धा तास माझ्यासारख्या पोर्ट्रेट आर्टिस्टसाठी पर्वणीच होती. चेहऱ्यावरचा प्रत्येक स्नायू बोलत होता. शरीराचं कणन कण व्यक्त होत होता. डोळ्यासमोर घडणाऱ्या त्या चमत्काराचा मी साक्षीदार होतो. ‘अफाट’ हा शब्दसुद्धा खुजा वाटावा एवढी विलक्षण, भावनांची निशब्द पेशकश एरवी अतिशय सौम्य वाटणाऱ्या चेहऱ्यावर त्या अर्ध्या तासात मी अनुभवली. सगळं जग जणू थांबलं होतं, फक्त मधूनच येणारा सॉफ्टबॉक्सचा 'ठुप' असा आवाज आणि कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट. एवढाच काय तो आवाज.
सरांना घरी सोडलं. पोर्ट्रेट झालं की कळवतो म्हणालो. दोनवेळा पेंटिंग केलं पण मनासारखं होईना. सरांना तसा एसेमेस करूनही मध्ये काही महिने उलटून गेले.
संध्याकाळी मिसळ खाताना श्रुती सांगत होती, प्रभावळकरांचा फोन आला होता. पोर्ट्रेटचं पुढे काय झालं असं ते विचारत होते. चित्रं ऑलमोस्ट पूर्ण झाल्याचं आणि त्यांच्या घरी नेऊन दाखवण्यापेक्षा त्यांना स्टुडिओवर घेऊन येणं शक्य आहे का असं मी श्रुतीला विचारलं.
श्रुती आणि मंदार सरांना घेऊन स्टुडिओवर आले. नेहरू सेंटरच्या प्रदर्शनापूर्वी दोन महिने मी माझा स्टुडिओ डॉ संदेश दोशींच्या घरातच थाटला होता. आपण इथं कुठे आलोय असा प्रश्न सरांना पडला असणार. मी पुढे होऊन त्यांचं स्वागत केलं आणि सरळ त्यांना पेंटिंग समोर नेऊन उभं केलं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पहात होतो. "अरे वा ! सुंदर. असे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. केवढं मोठ्ठं केलंय ? छानच झालंय, पण ... असे तीन भाग का ? हे ठिपके कसले ? असं विचारात राहिले.
"अंध व्यक्तींना चित्राला स्पर्श करून त्यातले भाव कळावेत, चित्र पाहताना अंध व्यक्तीना ते चित्रं ऐकता यायला हवं” ही 'क्लोज्ड आईज ओपन माईंडस'ची संकल्पना मी तोपर्यंत सरांना सांगितलीही नव्हती.
मी सरांना चित्रामागची कल्पना सांगितली. उद्देश सांगितला. दोन पाच मिनिटे ते पोर्ट्रेट कडे पाहत राहिले. निरीक्षण करत राहिले. चित्रातल्या सर्व पात्रांचे चेहेरे व त्या चित्रात ते किती छान वठलेत असं म्हणत होते. एवढंच नाही तर अंधमित्रांसारखा अनुभव घेण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधून त्यांनी ते पोर्ट्रेट बघितले. डोळ्याची पट्टी काढता काढता म्हणाले, “ह्या सर्व पात्रांची दृश्य ओळख चित्रातून उत्तम होते आहे. माझी माझ्या कामाकडे बघण्याची फिलॉसॉफी देखील उत्तमपणे मांडली गेली आहे. आपल्याला असं करता येईल का ? चित्र पाहताना अंध मित्रांना चित्र आणखी ज्यास्त कळावे म्हणून त्या त्या पात्रांचा आवाज आपण रेकॉर्ड करून चित्र पाहात असताना ऐकवला तर ?
आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी होती. एवढं नुसतं म्हणून सर थांबले नाहीत. आठ दिवसातच त्यांच्याकडून निरोपही आला. सर्व पात्रांची ओळख मी लिहून काढली आहे. आपण लगेच रेकॉर्डिंग करून टाकूया.
त्या दिवशी सकाळपासूनच मला रेकॉर्डिंगचे वेध लागले होते. एक प्रकारची हुरहूर मनात होती. नरेंद्र भिडेंच्या 'डॉन स्टुडिओत' गेलो आणि अनिरुद्धच्या स्टुडिओत डोळ्यांनी अनुभवला तसाच चमत्कार इथे डॉन स्टुडिओत, कानांनी अनुभवला. थरारक अनुभव ! आत्तासुद्धा अंगावर शहारा आलाय ! कॅमेऱ्या पुढे कायीक अभिनयाचा वस्तुपाठ मिळाला होता तर इथे माईकपुढे वाचिक अभिनयाचा. तब्बल १० पात्रांची ओळख असणारं स्क्रिप्ट घड्याळ लावून अवघ्या १७ मिनिटात ओके करून आम्ही स्टुडिओतून बाहेरही पडलो होतो. मी अजून त्या १७ मिनिटांच्या धक्क्यातून पुरता सावरलो नव्हतो. मी कार काढली. सरांना घरी सोडायला निघालो.
'चिमणराव ते गांधी' ... एवढाच नव्हे तर त्याही पलीकडचा केवढा तरी प्रवास ह्या आभाळाएवढ्या उत्तुंग कलावंताने माझ्या अंधमित्रांसाठी किती सहजपणे उलगडून दाखवला होता !
माझ्या मित्राचा अगदी कॉलेजच्या उंबरठ्यावरचा मुलगा अपघातात गेला होता. कारमधून घरी जाताना 'त्या मुलाच्या आई बाबांना हे दुःख पचवणं किती अवघड आहे' असं सांगत असताना सर भावूक झाले होते.
नेहरू सेंटरला रिस्पॉन्स कसा आहे ? आज किती अंधमित्रांनी प्रदर्शन पाहिले अशी आपुलकीची चौकशी रोज होत होती. हे एवढ्यावरच थांबलं नाही. मुंबईतील नेहरू सेंटरचं माझं प्रदर्शन ज्या दिवशी संपणार होतं त्या दिवशी कलादालनातून चित्रे काढून घेताना “मणीला खूप वाईट वाटेल, तेव्हा आपण त्याच्या बरोबर असायला हवं” असं म्हणत ते श्रुतीला आग्रहाने मुंबईला घेऊन आले. पेंटिंग्स काढून पॅकिंग होईपर्यंत तब्बल अडीच तास ते तेथे थांबून राहिले होते.
. . . स्टुडिओत बसून 'द मास्क' सिरीज मधील प्रभावळकरांची ही स्केचेस पहात असताना मला रडू फ़ुटायचं बाकी होतं. मला माझ्या सो कॉल्ड व्हिज्युअलायझेशनची कीव यायला लागली. दिलीप प्रभावळकरांसारख्या, माणूसपणाची परिसीमा असणाऱ्या, कलाकाराचा चेहरा मी 'मास्क' म्हणून पेंट करत होतो ? छे, कसंतरीच झालं मला !
पण ... ‘पोर्ट्रेट’ करायचं म्हणजे कोणत्याही गोष्टींना सामोरं जायची तयारी ठेवायला हवी. माणूस शोधता शोधता कधी मुखवट्याचा टवका उडेलही. पण इथे मात्र नेमकं उलटं घडलं होतं. एका ‘मास्क’चं पोर्ट्रेट करता करता अचानक त्यामागचा अस्सल माणूस मला गवसला होता !
- चिंतामणि हसबनीस
Author:
Sanjay
0 Comments
Rate this article:
No rating
Categories:
Blog
Number of views:
1015
Tags:
Please
login
or
register
to post comments.
cinego