Mani Hasabnis

Blog Post

द टीचर - ड्रीम, हिस्टरी अँड नाऊ

मागच्या आठवड्यात सायलेंट मोडवरचा माझा मोबाईल फोन थरथरला. 
'हॅलो,....' 
कुठल्याशा हेलन केलर अंध अपंग संस्थेतून तिथल्या मॅडम बोलत होत्या. 
हेलन केलरच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम केल्याचे सांगत होत्या. म्हणाल्या, 'आमच्या मुलांना तुम्ही काढलेलं हेलन केलरचं पेंटिंग बघायचंय हो. आम्ही खूप ऐकून आहोत त्या चित्राबद्दल'. मी त्यांना लवकरच तशी व्यवस्था करायचं आश्वासन दिलं.

'क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स' सिरीज मधलं हेलन केलरचं चित्र. 
नक्की कोणाचं आहे हे चित्र ? 
प्रदर्शनात खूपच गर्दी झाली की डोळस आणि अंधमित्रांचा ग्रुप करून ह्या चित्राची माहिती सांगताना मी प्रथम दृश्यचित्राचं वर्णन करतो ते आपल्या अंधमित्रांसाठी. विशेषकरून ज्या अंध मित्रांना ब्रेल वाचता येत नाही त्यांच्यासाठी. मी सांगू लागतो, "आपल्यासमोरच्या चित्रात अमिताभ बच्चन दिसतोय आणि त्याच्या पुढे बसलेल्या हेलन केलर आणि अँन सुलिव्हन. अमिताभ बच्चनने अप्रतिम अभिनयातून साकारलेला 'ब्लॅक' मधला ड्रीम टीचर हेलन केलर, अँन सुलिव्हन ह्यांच्या आठवणींना उजाळा देत घरोघरी पोहोचला." 
आता डोळसांचे डोळे चित्रावर नाही तर अंधमित्रांवर खिळलेले असतात. अंधमित्रांचे कान मी काय सांगतोय ते ऐकायला आसुसलेले असतात. मी पुढे सांगू लागतो, 
"अँन सुलिव्हन ही हेलन केलरची टीचर. कर्णबधीर, मूकबधीर आणि अंध असलेली हेलन केलर आज जगाला ठाऊक आहे ती केवळ अँन सुलिव्हनमुळे. पन्नास हून अधिक वर्षे ती सातत्याने हेलन केलर बरोबर राहिली. तिच्यामुळेच हेलन शिकू शकली. एवढी मोठी होऊ शकली. हा झाला इतिहास. अंध व्यक्तींच्या जीवनातील 'टीचर' चे स्थान चित्रातल्या व्यक्तिरेखांनी अधोरेखित केलंय. नाही का?" 
प्रत्यक्षात अंध व्यक्ती जेव्हा हे चित्र अनुभवतात तेव्हा त्यांना आपल्यापेक्षा हे चित्र अधिक अर्थपूर्ण रीतीनं समजतं. भावतं. चित्रावर बोटे फिरवून ते ह्या चित्रात पाहतात, शोधतात तो 'त्यांचा टीचर'. 
मी पुढे सांगू लागतो. "स्वागत थोरातने अंध व्यक्तीतील कलागुण ओळखले आणि त्यांना शिकवून 88 अंध कलाकारांचे 'स्वातंत्र्याची यशोगाथा' हे नाटक सादर केलं. हा नाट्यप्रयोग थेट गिनीज बुकात जाऊन बसला." 
बोलण्याच्या ओघात गाडी अशी डोळसांना 'न दिसणाऱ्या टीचर' पाशी येते. आता पुन्हा डोळस प्रेक्षकदेखील अतिशय लक्षपूर्वक माझे बोलणे ऐकू लागतात. 
"गेली एकोणीस वर्षे एक हजाराहून अधिक अंध विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणाऱ्या सौ. मीरा बडवे. लांबलांबच्या गावातून, खेड्यापाड्यातून मीराताईंकडे शिकायला येणाऱ्या अंधमित्रांच्या स्कॉलरशिप्स, नोकरीच्या अर्जांवर घरचा पत्ता म्हणून मीराताईंचा पत्ता असतो. हजारो अंधमित्रानी त्यांना कधीच ममत्व बहाल करून टाकलंय." 
हॉलमधील वातावरणात होणारे सूक्ष्म बदल जाणवू लागतात. 'ह्यांना चित्रातलं खरेच काही कळत असेल का ?' असं ज्या पार्टीला वाटत असतं ती पार्टी आता एकदम बॅकफूटवर गेलेली असते. आणि ज्यांचं आकलन दृष्टीपलीकडचं आहे त्यांच्या हालचालीत ओळख पटल्याच्या खुणा स्पष्ट दिसू लागतात. त्यांच्या 'टीचर्स' बद्दलची कृतज्ञतेची भावना मला त्यांच्या 'डोळ्यात' सुद्धा दिसायला लागते. बॅकफूटवर गेलेल्या पार्टीचीसुध्दा आता खात्री पटलेली असते. 
क्षणभर आपापल्या 'टीचर' चे स्मरण करण्याचं आणि त्यांना थँक्स म्हणण्याचं आवाहन मी सगळ्यांना करतो. नकळत हात जोडले जातात. डोळे मिटतात. हो. सगळ्यांचेच ! त्यांचेसुद्धा ! कारण असे डोळे मिटण्याची ही क्रिया शारीरिक नसून मानसिक असते. सगळ्यांच्या मनासमोर तरळू लागतो त्यांचा त्यांचा आवडता 'टीचर'. 
एक दोन तीन म्हटल्यावर सगळ्यांनी एकसुरात 'टीचर' ला थँक्स म्हणायचं ठरलेलं असतं. मी मोठयाने आकडे मोजतो "एक दोन तीन" 
'थँक्स' असं फक्त ऐकू येतं. कंठाशी हुंदका दाटून आलेला असतो. माझ्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. 
जे डोळ्यांना दिसतं ते रिऍलिस्टिक आणि जे दिसतं त्याही पलीकडे जाऊन जे अनुभवायचं असतं ते अँबस्ट्रॅक्ट. अनेकदा ऐकलेल्या रिऍलिस्टिक आणि अँबस्ट्रॅक्ट ह्या शब्दांचे अर्थ मला नव्याने समजू लागतात. 
मी डोळे उघडतो. डोळे उघडले तरी समोरचं काही दिसत नसतं.

शेजारचा 'प्रेक्षक' माझा हात धरतो आणि मला विचारतो, "पुढचं चित्र पहायचं ना?" 

Author: Sanjay
0 Comments
Rate this article:
No rating

Categories: BlogNumber of views: 145

Tags:

Please login or register to post comments.

123 movies