Mani Hasabnis

Blog Post

Thursday, February 23, 2017

मुंबईतील नेहरू सेंटरमधील प्रदर्शनाचा पाचवा दिवस.

मुंबईतील नेहरू सेंटरमधील प्रदर्शनाचा पाचवा दिवस.

पुण्यातील समर्थ प्रतिष्ठानने पुण्याहून काही अंधमित्रांना प्रदर्शन दाखवण्याची जबाबदारी घेतली होती. दुपारी 12.30 च्या सुमारास 200 अंधमित्रांचा ग्रुप हॉलमध्ये येऊन धडकला. समर्थ प्रतिष्ठानचे ह्या अंधमित्रांचे ढोलताशा पथक आहे. पुण्यातील गणेशोत्सवात ही मुले ढोल ताशा वाजवतात. लेझीम खेळतात. ह्या मुलांना घेऊन चार गाड्या नेहरू सेंटरच्या दारात येऊन उभ्या राहिल्या. सगळे जण रांगा करून शिस्तबद्धपणे 'कलादालनाकडे' वळले आणि नेहरू सायन्स सेंटर मधले सर्व कर्मचारी, 'डिसकव्हरी ऑफ इंडिया' पहायला आलेले प्रेक्षक गर्दी करून कलादालनाच्या दरवाजातच थबकले. त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.

चेहऱ्यावर कमालीचं औत्सुक्य, आपल्या जाणिवांच्या पलीकडचं असं काहीतरी वेगळं अनुभवता येणार असंच आपल्या अंधमित्रांची देहबोली सांगत होती. ह्या अंधमित्रांना मुंबईला प्रदर्शन दाखवून पुण्यापर्यंत सुखरूप आणणे ह्या जबाबदारीचा ताण नाही म्हणलं तरी स्वयंसेवकांवर होताच. परंतु हॉलमध्ये प्रवेश झाल्यावर ह्या स्वयंसेवकांवरचा ताण थोडा हलका झाला असेल.

आपले मित्र 'चित्र पहायला' पुढे सरसावले. अशा वेळेस मी डोळस प्रेक्षकांना ह्या सोहळ्यात सामील करून घेतो. ब्रेल लिपीच्या ठिपक्यांचे हे पॅटर्न्स चित्रात आपल्यासारख्या डोळसांसाठी टेक्सचर्स म्हणून सौन्दर्य निर्माण करतात. पाहणाऱ्यांसाठी जे फक्त टेक्सचर पॅटर्न्स असतात तेच पॅटर्न्स आता अंधमित्रांशी चक्क बोलू लागतात. संवाद साधू लागतात.

अंध आणि डोळस, अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना जमतील तशी उत्तरे देता देता माझी अवस्था होऊन जाते ती टू इन वन, स्कॅनर-कॉपियर सारखी. इनपुट अँड आउटपुट डिव्हाईस. मी डोळ्यांना दिसणारे दृश्य आणि मनातील भावना ह्यांचं स्कॅनिंग करायचा प्रयत्न करत राहतो. कॉम्प्युटर ची जशी '01101001' ह्या स्वरूपातली कोड लँग्वेज असते तसेच काहीतरी सहा ठिपक्यांच्या कोड लँग्वेज मधून उलगडण्याचा प्रयत्न मी करत असतो. इथे 'दुभाषा' हा शब्द मी मुद्दाम टाळतोय. कारण ब्रेल ही भाषा नव्हे तर लिपी आहे. दृश्यचित्र आणि चित्रातील भावना ह्यांच्या कन्व्हर्जनला काय म्हणायचं हे मला अजून तरी कळलेलं नाही.

मुळात चित्रकला ही जगाची भाषा आहेच. भाषेपलिकडचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य चित्रकलेत आहे. आपल्या खास प्रेक्षकांना चित्रानुभव देताना मात्र भाषेमुळे थोडी अडचण येऊ शकते ही सल मनांत आहेच.

जिथे गरज पडेल तिथे अंधमित्रांशी गप्पा मारत, वेळप्रसंगी त्यांना बोलते करत, तर कधी अंधमित्रांकरवी डोळसांना चित्राचा न कळलेला अर्थ पोहोचवत; चित्र अनुभवण्याचा हा 'नेत्रदीपक' सोहळा दोन तासापर्यंत चालू होता. हॉलच्या सर्व कोपऱ्यातून सारख्या 'चिंतामणी सर', 'चिंतामणी सर' अशा हाका ऐकू येत होत्या. एवढ्या सगळ्या मित्रमंडळींच्या सर्वच प्रश्नांना खरे तर माझ्याजवळ उत्तरे नव्हती. पण गम्मत पहा, 'त्यांनी' मला कधीच समजून घेतलं होतं. एखाद्या प्रश्नापाशी मी अडलो की त्या मित्रांतलाच एखादा त्या प्रश्नाचं उत्तर देऊन मोकळा व्हायचा.

चित्रे पाहून झाल्यावर आम्ही सगळे गप्पागोष्टी करत हॉलमध्येच बसलो होतो.

संतोष वाघमारे. किडकिडीत, विस्कटलेल्या केसांचा, थोडासा गबाळा वाटणारा हा तरुण दोन शब्द बोलायला उभा राहिला आणि तो जे बोलला ते ऐकून हॉलमध्ये जमलेली तीनेकशे मंडळी थक्क झाली. तो सांगत होता, " इथे येऊन मी सगळी चित्रे पाहिली, हाताने चाचपली, ब्रेलमध्ये वाचली, आणि एमपीथ्री मध्ये ती ऐकली सुद्धा." रविशंकर, शिवकुमार शर्मा अशा जगप्रसिद्ध कलाकारांचे विचार कळले. त्यांचा आपल्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळला. कामावरची निष्ठा कळली. दिलीप प्रभावळकरांचे दहा रोल्स ऐकून माझ्या डोळ्यासमोर दिलीप प्रभावळकर कसे दिसत असतील ह्याचं चित्र उभं राहिलं."

संतोषने पुढे केलेली फर्माईश माणसाच्या 'दिसणं' ह्या गरजेला अधोरेखित करणारी होती.

"खरं सांगू का चिंतामणी सर, तुमचे पुढचे प्रदर्शन जगाच्या पाठीवर कुठेही असूदे, पहायला आम्ही नक्की येणार, आणि आमची सगळ्यांची तुम्हाला एकच विनंती आहे की, आम्ही विचारसुध्दा न केलेल्या, कधीही जाऊ शकणार नाही अशा चित्रांच्या दुनियेत घेऊन जाणारा माणूस कसा दिसतो तो आम्हाला पहायचाय. चिंतामणी सर, आम्हाला पुढच्या प्रदर्शनातील पहिलं चित्र म्हणून तुमचं सेल्फ पोर्ट्रेट पाहायचंय." 

Author: Sanjay
0 Comments
Rate this article:
No rating

Categories: BlogNumber of views: 205

Tags:

Please login or register to post comments.

123 movies