Thursday, February 23, 2017
दरवर्षी आम्ही काही अंधमित्र आपल्या जवानांबरोबर दिवाळी साजरी करायला सीमारेषेवर जातो. वेळ पडल्यास तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढाई करायला तयार आहोत अशी ग्वाही देऊन त्यांच्या सेवेबद्दल त्यांना सलाम करतो.
कोल्हापूरहून आलेला एका अंध व्यक्तीचा हा फोन. तो सांगत होता,
ह्यावर्षी फराळ, मिठाई, शुभेच्छांबरोबरच अजून एक गोष्ट आम्हाला आपल्या जवानांसाठी न्यावीशी वाटते. फक्त आमच्याच नाही तर सर्व देशवासीयांच्या भावना व्यक्त होतील असं एखादं पेंटिंग सीमेवर लढणाऱ्या जवानांना भेट देता आलं... तर? तुझी पेंटिंग आमच्यासारख्या अंधांना समजतात. आवडतात. आमच्या भावना तुझ्या पेंटिंगमधून तू व्यक्त करू शकशील असा आम्हाला विश्वास वाटतो. मणी दादा, असं एक छान पेंटिंग तू आमच्यासाठी करून देशील का?
माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. मी पुन्हा एकदा जागच्या जागी थिजून गेलो. हो. पुन्हा एकदा !!
गेल्या काही महिन्यातील हा दुसरा प्रसंग. पहिला प्रसंग हतबल करून टाकणारा. डिप्रेसिंग. घोर नैराश्यानं ग्रासून टाकणारा.
झालं असं... फेसबुकवरून एक मेसेज आला. माझी पोर्ट्रेट्स आवडतात असं सांगणारा. पोर्ट्रेटच्या ऑर्डर्स घेता का असा प्रश्नही होता. त्या व्यक्तीला तिच्या ५ वर्षाच्या मुलाचं पोर्ट्रेट करून हवं होतं. फोटोवरून कराल का? एका पोर्ट्रेटचे किती पैसे घेता? वगैरे चौकशी फोनवरून झाली. पुढे ती व्यक्ती हळूच म्हणाली, तुमची बाकीची पोर्ट्रेट्स जेवढी सुंदर आहेत तेवढंच सुंदर हे पोर्ट्रेट काढाल ना? काढलाच म्हणा. खात्री आहे माझी. कसंही करून आमचा मुलगा कसा दिसतो हे मला माझ्या मिस्टरांना दाखवायचंच आहे. माझ्या मिस्टरांनी अजून आमच्या मुलाला पाहिलं नाहीये. ते अंध आहेत.
माझ्या स्टुडिओचं आतलं दार ह्या फोननंतर जवळपास बंदच झालं होतं.
आणि आता... काही वेळापूर्वी आलेला हा फोन... विचारचक्र पुन्हा एकदा सुरु झालं. दोन प्रसंगातील संदर्भ वेगळे. पण सारांश तोच. प्रतिक्रिया वेगळी असेलही कदाचित, पण व्यक्त होण्याची, भावना पोहोचवण्याची माणसाची गरज तेवढीच प्रखर असल्याचं जाणवू लागलं. आणि त्याही पलीकडे जाऊन कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची माणूसपणाची धडपड अधोरेखित होत राहिली.
मनावर साठलेली काजळी दूर होऊ लागली. उजेडाची तिरीप दिसू लागली.
मोठ्या आशेने, विश्वासाने अंधमित्रांनी त्यांची कल्पना माझ्यापुढे मांडली होती. त्या भावनेचा आदर करणे हेच माझं कर्तव्य होतं. पेंटिंग चांगलं होईल - ना होईल, पण प्रयत्नच न करण्याची घोडचूक माझ्या हातून होऊन चालणार नव्हती. मनानं आता पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. नवीन कल्पनांनी, स्वच्छ विचारांनी मन आता भरून गेलंय. आणि स्टुडिओचं आतलं दार मी आज पुन्हा एकदा उघडलंय! माझे डोळे आपोआपच मिटले गेलेत. आणि डोळ्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या असंख्य प्रतिमांची जुळवाजुळव मनात सुरु झाली आहे.
... चिंतामणि हसबनीस
Categories: BlogNumber of views: 970
Tags: