Thursday, February 23, 2017
पुण्यातील प्रदर्शनाचा दुसरा दिवस. प्रदर्शन पाहायला खूपच गर्दी झालेली होती. सोलापूरहून आलेल्या मित्रांपैकी १५-२० अंधमित्रांचा गट करून त्यांना मी पेंटिंग दाखवत होतो. एवढ्यात पलीकडच्या बाजूने 'तुला कोणीतरी बोलावत आहे' असा निरोप आला. पुढच्या पेंटिंगपाशी जाण्याआधी 'आलोच पाच मिनिटांत' असं सांगून मी जिकडून बोलावणं आलं तिकडे जाऊ लागलो.
हळूच मागे वळून पाहिलं तर मी दूर जात असताना होणाऱ्या माझ्या पावलांच्या आवाजाकडे माझ्या 'त्या मित्रांचे कान एकटक पाहात' असल्याचं मला जाणवलं. "आत्ता कुठे एका वेगळ्याच जगात निघालो होतो आणि हा माणूस आम्हाला असं ताटकळत ठेऊन मधेच कुठे निघून गेला?" ही नाराजी मित्रांच्या देहबोलीतून व्यक्त होत होती. आता माझं पाऊल पुढे पडेना. मी गार्गीला हाक मारली. मी येईपर्यंत पुढचं पेंटिंग मित्रांना दाखवण्याच्या सूचना तिला दिल्या आणि पुढे झालो.
'क्लोज्ड आइज अँड ओपन माइंड्स' ह्या माझ्या आवडत्या पेंटिंगपाशी ते दोघे उभे होते. साठीच्या आसपासचा एक गृहस्थ आणि शाळा - कॉलेजमधला एक मुलगा. किडकिडीत, पाठीवर हॅवर सॅक, त्या सॅकच्या चेनच्या कप्प्यातून बाहेर डोकावणारी व्हाईट केन !
त्या गृहस्थांना माझी पेंटिंग्स खूप आवडली होती. विशेषतः दिलीप प्रभावळकर आणि नरेंद्र मोदींची पोर्ट्रेट्स. भरभरून बोलत होते. चित्रांचं आणि त्यामागच्या कल्पनेचं कौतुक करत होते. पुढे असंही म्हणाले, "मला पेंटिंग मधलं काही कळत नाही. खरं तर, मी 'ह्याला घेऊन आलोय', चित्र दाखवायला ! माझ्याच घराजवळ राहतो. मधून मधून माझ्याकडे येत असतो. हुशार आहे. एका ब्लाईंड इन्स्टिट्यूट मध्ये मसाजरचा कोर्स करतोय. जमेल तेवढी मदत मी करत असतो. ऑपरेशन केलं तर त्याला दिसू शकेल अशी परिस्थिती आहे.
किती खूष झालाय पहा तो इथे येऊन. चित्रावरून हात फिरवतोय. मला सांगतोय, हे 'पंडित रवीशंकर'... हे आमच्या टीचरचं चित्रं. पुढे चित्राची माहिती तोच मला सांगतोय. अजब आहे. हेडफोन सारखा माझ्या कानाला लावायला सांगतोय. हसतोय... काय करू आणि काय नको असं झालंय त्याला. खरंच इतक्या लांबून त्याला इथे घेऊन आल्याचं सार्थक झालं. आईबापाला तीर्थयात्रेला घेऊन गेल्याचं पुण्य मिळालं.
काय आयुष्य आहे हो नाहीतर, 'आय बँकेत' नाव नोंदवलंय, पंधरा दिवसातून एकदा आय बँकेत जायचं. आलेत का कुठले डोळे ते बघायला. मिळेल का एखादा डोळा आपल्याला ? दिसेल का आपल्याला हे जग ? ... निराशा पदरी घेऊन तो परत येतो. बोलत नाही कोणाशीच. पण साहेब, तुम्हाला सांगतो, इथे आल्यावर समजतंय, तुम्ही जी 'ही दृष्टी' देताय ना सगळ्यांना, ती 'त्या दृष्टीपेक्षा' लाख मोलाची आहे.
काय बोलावं मला समजेना. मी त्या गृहस्थाचे थरथरणारे हात हातात घेतले. दोघांचेही डोळे पाणावलेले. मी त्या मुलाकडे मान वळवली.
तो मुलगा त्या चित्रावरून बोटे फिरवत होता. चित्रातील ब्रेल नेहमीपेक्षा आकाराने थोडे मोठे असल्यामुळे त्या मुलाच्या मदतीकरता मी पुढे सरसावलो...
... मी त्याचा हात हातात घेतो. डिझाईन सारख्या दिसणाऱ्या त्या ब्रेल मजकुरावरून त्याची बोटे फिरवू लागतो. ब्रेल लिपीच्या ठिपक्यांचे नंबर्स मी मोठ्याने म्हणू लागतो. 'वन-थ्री'. तो म्हणतो 'क'. 'थ्री-फोर-फाईव्ह'. तो म्हणतो 'क' ला काना का. 'वन-टू-फाईव्ह'. तो म्हणतो 'ह'. 'थ्री-फाईव्ह'. तो म्हणतो 'ह' ला दीर्घ वेलांटी 'ही' ... का ही ... पुढचं वाक्य मी पूर्ण करतो. 'काही क्षण डोळे बंद करूया आणि मनाची कवाडं उघडूया.'
माझं हे आव्हान स्वीकारत सगळे 'फ्लेमिंगो' तर आधीच कलादालनात जमले आहेत चित्रातूनच एक खिडकी मी उघडली आहे चित्रातील ठिपक्यांना आता शब्दांचा मोहोर आला आहे अर्थाची पालवी फुटली आहे आणि . . . निळ्याशार आभाळात नवी क्षितिजे शोधायला आता फ्लेमिंगोंनी उंच भरारी घेतली आहे.
_ चिंतामणि हसबनीस
Categories: BlogNumber of views: 911
Tags: